औरंगाबाद- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा पुन्हा एकदा पालकमंत्र्यांविना पोरका झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना- भाजप मधील अंतर्गत धुसफूस पाहता भाजपला शह देण्यासाठी पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची पालकमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०१४ साली राज्यात सेना भाजपची सत्ता
आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आले. सुरुवातीला
पालकमंत्री पदी पर्यावरण खात्येचे मंत्री रामदास कदम यांच्या वाट्याला आले. कदम
यांनी त्यांच्या स्टाईलने कामकाज सुरु केले. त्यामुळे खा. चंद्रकांत खैरे यांच्या
राजकीय वर्चस्वाला धक्का बसू लागला होता. त्यामुळे खैरे आणि कदम यांच्यात शाब्दिक
चकमकी झाडू लागल्या होत्या. अखेर २०१७ मध्ये कदम यांना मंत्रिपदावरून हटवून
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना पालकमंत्री बनवण्यात आले पण सावंत यांचा कधी
जिल्ह्याच्या विकासात रस दिसून आला नाही. सावंत केवळ बैठका आणि
उद्धघाटनासाठीच शहरात येत असत. अशातच सोमवारी दि. ०७ त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा
दिला. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त झाले. सध्या सेना भाजप मध्ये धुसफूस
सुरु आहे दोन्ही पक्षाची युती असून देखील नसल्यासारखीच आहे. दोन्ही पक्ष स्वबळाची
भाषा वापरत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद, पैठण हे चार तालुके जालना लोकसभा मतदार
संघात येतात. सेनेकडून अर्जुन खोतकर खा. रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक
लढवण्यास उत्सुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी दौरे ही सुरु आहेत. पूर्वीचे
पालकमंत्री रामदास कदम पुन्हा पालकमंत्री म्हणून येण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे
अर्जुन खोतकर यांच सेनेकडून पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नाव दिले जाणार
असल्याचे कळते. खोतकर पालकमंत्री झाल्यास खा. दानवेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे.